याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी गर्भवती असल्याने, त्यातच तिला प्रसूती वेदना होत असल्याने कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे सिझर (प्रसूती) करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष अडगळे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाच मागितली. ती रक्कम तडजोडीअंती ९ हजार रुपयांवर ठरली.
याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीचा शहानिशा करून शुक्रवारी दुपारी बाराच्यादरम्यान कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात सापळा रचून डॉ. अडगळे यांना ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कामगिरीत पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी या पथकास मार्गदर्शन केले. ही कामगिरी एसीबी सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अंमलदार पवार, सण्णके यांनी पार पाडली.
फोटो - डॉ. संतोष अडगळे
----