सोलापूर : समस्त अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष उभा केला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत सोलापूरला ११ वेळा भेट दिली. भविष्यातील चळवळीचे अनेक धोरणात्मक निर्णय थोरला राजवाड्यातील पंचाच्या चावडीत घेऊन कालांतराने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली होती. त्याच ठिकाणी आज अस्तित्वात असलेल्या अस्थिविहाराला ६२ वर्षे पूर्ण होत आहेत़ मुंबई, नागपूर नंतर अभिवादन करण्यासाठी एक हक्काचे ठिकाण म्हणून अस्थिविहार प्रेरणाभूमीकडे पाहिले जाते.
६ डिसेंबर १९५६ साली मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. पांजरापोळ चौकातील सी. नरसी ट्रान्स्पोर्टमध्ये निरोप आला. ही बातमी वाºयासारखी संपूर्ण शहर व जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरू जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण आबुटे, मेसा सिद्धगणेश, दºयाप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दि. ७ डिसेंबर रोजी लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निरोप देण्यात आला.
तुकाराम (बुवा) इंगळे हे बाबासाहेबांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या दैनिकाचे जिल्हा वितरक होते. त्यामुळे त्यांचे भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थी सोलापूरला घेऊन जाण्याचा आग्रह धरला, त्यासाठी ते चार दिवस मुंबईमध्येच राहिले. त्यानंतर दि. ११ डिसेंबर १९५६ साली या अस्थी सकाळी ८ वाजता मद्रास मेलने मुंबईहून सोलापुरात आणण्यात आल्या. रेल्वे स्टेशनबाहेर सुमारे ५ ते ६ हजार जनसमुदाय उपस्थित होता. दलित फेडरेशनच्या वतीने सकाळी ९ वाजता फॉरेस्ट विभागातील शाळा नं. १० पासून डॉ. आंबेडकरांच्या अस्थींची मिरवणूक निघाली. ज्यांना मुंबई येथे जाता आले नाही त्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेऊन दुखवटा व्यक्त केला. सुमारे २५ ते ३0 हजार जनसमुदाय मिरवणुकीमध्ये होता. बुद्धम्, सरणम् गच्छामी...धम्मम् सरणम् गच्छामी... अशी प्रार्थना म्हणत सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता पांजरापोळ चौकात झाली आणि याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाबा बाबरे यांनी मांडली होती अस्थिविहाराची संकल्पना- भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे हे २000 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे व थोरला मंगळवेढा तालमीचे अध्यक्ष होते. त्यांनी भव्य अस्थिमंदिर बांधण्याची संकल्पना व्यक्त केली होती. तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे यांना सांगून खासदार निधीतून फंड मंजूर करून घेतला. बांधकाम झाले, मात्र काही कारणास्तव ते अपूर्ण राहिले. कालांतराने नगरसेवक आनंद चंदनशिवे हे निवडून आल्यानंतर त्यांनी अस्थिविहार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. भव्य आणि दिव्य अशा अस्थिमंदिराची निर्मिती झाली. आज या अस्थी ‘एससी’ (एअर कोल्ड) वातावरणात ठेवण्यात आल्या आहेत. अस्थिविहारात आनंद चंदनशिवे यांनी भीमसृष्टी निर्माण करून बाबासाहेबांचा इतिहास कोरला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी महार वतनदार परिषद घेतली होती त्या पंचाच्या चावडीत २६/२७ नोव्हेंबर १९२७ रोजीच्या दुर्मिळ फोटोचे ब्रांझ शिल्प बसवून आंबेडकरांचा इतिहास जोपासला आहे.
परिसरात अशोक स्तंभ, घटनेचा सारनामा : चंदनशिवे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिमंदिर हे समाजात श्रद्धास्थान आहे. या परिसरात अशोक स्तंभ आणि भारतीय राज्यघटनेचा सारनामा उभारण्यात येणार आहे. अस्थिविहार प्रेरणाभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम मागे पडत आहे. भविष्यात यासाठी राज्य आणि केंद्राच्या पातळीवर पाठपुरावा करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवणार आहे. शहर व जिल्ह्यातील समाजबांधवांनी अभिवादनासाठी अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे यावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिमंदिरात अभिवादन करावे, असे आवाहन बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केले आहे.