सोलापूर : घातक शस्त्राद्वारे शहरातील सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या सुरज बबनराव शिकारे (वय- ३०, रा. उद्धव नगर, विजापूर रोड, सोलापूर) याला शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश बजावला. आगामी काळात विविध समाजाचे सण उत्सव, मिरवणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज शिकारे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण, घातक शस्त्राद्वारे दहशत पसरवून दंगा करणे अशा गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे पोलीस रेकार्डवर नोंद आहेत.
त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचे तडीपारीचे आदेश पारित केले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कर्नाटकातील इंडी येथे सोडण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, संगीता पाटील, सपोनि शीतलकुमार गायकवाड, पोलीस रमेश कोर्सेगाव यांनी केली.