लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर: तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असून रात्री दोनच्या सुमारास हनुमान दरवाज्याच्या बाजूला दगड खचल्याचे दिसून आले. या दगडाचे काम करताना आत खालील बाजूला पोकळी दिसली. तेथे तळघर असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे यादवकालीन पुरातन मंदिर असल्याची माहिती अनेक संतांच्या अभंगातून ग्रंथातून मिळते. त्यामध्ये कुठे विठ्ठल मंदिरात तळघर असल्याचा संदर्भ आहे का? ते पाहावे लागेल असे पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने म्हणाले.
मंदिरातील हनुमान गेटजवळ चुना काढून नव्याने दरर्जा भरण्याचे काम सुरू असताना तेथील एक दगड सरकला व त्या दगडाखाली खोली दिसून आली आहे. आत व्यवस्थित पाहिले असता पुरातन मूर्ती दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी तळघर असण्याची शक्यता वर्तविली गेली.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना ही बाब निदर्शनास आली. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तसेच मंदिराबाबत जुनी माहिती असलेल्या काही लोकांसमोर या ठिकाणची तपासणी करण्यात येईल, असे शेळके यांनी यावेळी सांगितले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना एक दगड सरकला आणि त्याठिकाणी तळघराचा रस्ता दिसून आला. या तळघरात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. पाच फूट बाय सहा फूट असे हे तळघर आहे. याची उंची पाच फूट आहे.
उद्यापासून पदस्पर्श दर्शनास होणार प्रारंभ
- पंढरपूर येथील मंदिराचे पुरातन रूप जतन व संवर्धनासाठी १५ मार्चपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम सुरुवातीला ४५ दिवसांत पूर्ण होणार होते. परंतु मुदत वाढविल्याने आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
- २ जूनपासून पदस्पर्श दर्शन भाविकांना सुरू होणार आहे. परंपरेनुसार पहाटे नित्य पूजा पुजाऱ्यांच्या मार्फत व पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांचे दर्शन सुरू केले जाईल.
- श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात शुक्रवारी सायंकाळी पुरातत्व विभाग व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी तळघरात श्री विष्णूच्या दोन मूर्ती आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती, पादुका आणि अन्य दोन छोट्या अशा एकूण सहा मूर्ती दिसून आल्या. याशिवाय काही पुरातन नाणीही येथे आढळून आली.
गरुड खांबावर चांदी लावण्यास विरोध
मंदिरात संवर्धन कामाच्या वेळी अनेक ठिकाणची चांदी काढली. बऱ्याच ठिकाणी जीर्ण व तुटलेली चांदी होती. ही सर्व चांदी ८७७ किलो भरली. पुरातत्त्व विभागाने गरुड खांबावर चांदी लावण्यास विरोध केला आहे. चांदी लावल्यास दगडाचे आयुष्य कमी होते असे सांगण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी चांदी लावायची का नाही, याचा निर्णय मंदिर समिती घेणार आहे.- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती