सोलापूर: पेरल तेच उगवत असतंय, उत्तर सोलापूर तालुक्यात तेच झालंय. आघाडी सरकारने १५ वर्षांत शिरापूर उपसा सिंचनला निधी दिला नसल्याने शेतीला पाणी मिळालं नाही; मात्र शिवसेना-भाजपा युतीच्या कालावधीत मंजूर झालेली शिरापूर उपसा सिंचन योजना आम्हीच पूर्ण करु. योजनेच्या माध्यमातून मिळणारी दलाली बंद झाल्याने विरोधक ओरडत असल्याचा आरोपही सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केला.
विविध शासकीय योजनेतून मंजूर निधी व साहित्य वाटपाचा कार्यक्रम मार्डी येथे सोमवारी झाला. त्यावेळी देशमुख बोलत होते. शिरापूर उपसा सिंचना पूर्ण करून पाणी द्या अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी केली होती. तोच धागा पकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, जे पेरल तेच उगवतं, उत्तर तालुक्यातही असेच झाले आहे. भ्रष्टाचारी माणसं सत्तेत पेरली त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला. असल्याचे सहकार मंत्री म्हणाले. आघाडी सरकारने १५ वर्षांत निधी दिला होता का? बेइमान माणसं एकत्रित येऊन राजावर टीका करीत असताना आपला राजा प्रामाणिक आहे हे ओळखावे असे आवाहन खासदार अमर साबळे यावेळी बोलताना उपस्थितांना केले.
शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले. देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी वरुन एक रुपया पाठविला तर १० पैसे खाली पोहोचतात असे सांगितले होते; मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅनलाईन पद्धती सुरू केल्याने पाठविलेला एक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो असे भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सभापती संध्याराणी पवार, काशिनाथ कदम यांचीही भाषणे झाली. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून ६२६ लाभार्थ्यांना गॅस, ८७० कामगारांना अनुदान,मुलींना सायकली, शिलाई मशीन,शेतकºयांना ताडपत्री व ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राज्य बँकेचे संचालक अविनाथ महागावकर, बाजार समितीचे संचालक अशोक निंबर्गी, श्रीमंत बंडगर, मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक शशी थोरात, सरपंच शोभा गुंड, कौशल्या सुतार, राधाबाई गाडेकर, वैशाली गरड, संजय भोसले,पूर्वा वाघमारे, चंद्रप्रभा भास्कर, लिंबाजी जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला इंद्रजित पवार, शिवाजी सोनार, संभाजी भडकुंबे, कुमार बिंगारे, युवराज पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण साबळे, उपसभापती रजनी भडकुंबे, गटविकास अधिकारी रंजना कांबळे,सरपंच अविनाश मार्तंडे, संभाजी दडे, जयश्री चौगुले, कमलाकर माने, अंबीर बोंगे, विशाल कदम, सईद शेख आदी उपस्थित होते.