मंदार पाटील (नाव बदललेले) माझा तसा बºयापैकी जवळचा मित्र. आठ-पंधरा दिवसांत आमची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, पण गेले काही आठवडे तो मला भेटला नव्हता. कामाच्या रगाड्यात मला ते फारसे लक्षातही आले नाही. अचानक एकेदिवशी तो माझ्या ओपीडीत उगवला. थोडासा कृश झालेला होता, थकल्यासारखा दिसत होता. मी त्याला काळजीने विचारले ‘अरे, काय झाले? आजारी आहेस का?’ तेव्हा तो म्हणाला ‘काही नाही रे,? अॅनिमियावरची ट्रीटमेंट चालू आहे
माझी. ‘चाळिशीच्या जवळपास अॅनिमिया? (रक्तक्षय) माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला म्हटलं, झोप बघू जरा टेबलावर, तपासू देत मला तुला.’ काही गरज नाही रे, यापूर्वीही त्या एक्सवायझेड सर्जनने मला तपासले आहे. मला इतर कोणताही आजार नाही. अॅनिमियाच्या गोळ्या घेतो आहे मी. होईल बरा. ‘अरे, तुझ्याकडून फी घेणार नाही मी, काळजी करू नकोस.’ असे म्हटल्यावर तो हसत हसत तपासण्याच्या टेबलवर झोपला. त्याच्याशी चर्चा करताना मला असे लक्षात आले होते की, त्याच्या शौचाच्या सवयीही अशात बदललेल्या आहेत. माझ्या दृष्टीने हे चांगले लक्षण नव्हते. चाळिशीच्या जवळपास वय, नुकत्याच बदललेल्या शौचाच्या सवयी आणि रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की, आम्ही सर्जन फक्त एकाच रोगाचा विचार करू शकतो, तो म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर. तपासल्यानंतर माझी शंका आणखी बळावली आणि म्हणून मी त्याला मोठ्या आतड्याची दुर्बिणीने तपासणी म्हणजेच कोलोनोस्कोपी करण्यास सांगितले.
दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली, माझ्या या मित्राला मोठ्या आतड्याचा कॅन्सर निघाला. बायॉप्सी करावी लागली. पुढे पोटाचा सीटी स्कॅन करण्यासाठी मी त्याला एका मोठ्या रुग्णालयात पाठविले. परंतु मी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले नव्हते. वहिनी किंवा त्याचा मुलगा जर बरोबर आले तर त्यांना हे सांगावे, असा माझा प्लॅन होता. परंतु प्रत्येक वेळी तो एकटाच माझ्याकडे येई आणि मग मी ही गोष्ट पुढे ढकलत असे. या मोठ्या रुग्णालयात मीही कन्सल्टंट असल्याने त्याचा सीटी स्कॅन मी स्वत: पाहिला, तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टबरोबर चर्चा केली. त्याच्या काही तपासण्या माझ्या हॉस्पिटलमधे केल्या. बायॉप्सीचा रिपोर्ट येण्यास साधारणपणे एक आठवडा लागतो.
दरम्यान, त्याचा अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय कमी करण्यासाठी त्याला दोन रक्ताच्या बाटल्याही मी माझ्या हॉस्पिटलमध्ये चढविल्या. त्याचे फारसे बिलही घेतले नाही. त्याला आता आॅपरेशनची गरज आहे, हेही मी सांगितले. मोठ्या आतड्याचा काही भाग काढून टाकावा लागेल, हे मी त्याला सांगितले, परंतु कॅन्सरचा उल्लेख टाळून. माझ्या निदान कौशल्याचे या मित्राने खूपच कौतुक केले. इतर डॉक्टरांना जमले नाही, पण मी ते कसे अचूक केले याचे कौतुक करताना तो थकत नव्हता. मलाही अंगावर मूठभर मांस चढले.माझा मेडिकल इन्शुरन्स असल्यामुळे हे आॅपरेशन जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये केले तर मला ते कॅशलेस होईल, असे सांगून त्याने हे आॅपरेशन मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्याची मला विनंती केली.
मलाही त्यात कोणतीही अडचण नव्हती. रेफरल चीट देऊन मी त्याला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास पाठविले. पण हा पठ्ठ्या तिकडे पोहोचलाच नाही. तो अॅडमिटही झाला नाही आणि मला काही निरोपही त्याच्याकडून मिळाला नाही. मला असे वाटले की, कदाचित काही दिवसांनी तो अॅडमिट होण्यास येईल आणि मग पुन्हा मी माझ्या कामाच्या ओघात ही गोष्ट विसरून गेलो. या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी आॅपरेशन्स चालू असतात. एकेदिवशी माझे एकाद् दुसºया रुग्णाचे आॅपरेशन सुरू करण्यापूर्वी सहज म्हणून मी आॅपरेशन थिएटरच्या लॉबीमध्ये उभा होतो आणि आॅपरेशन थिएटरमध्ये बोर्डवर रुग्णांच्या यादीमध्ये मला माझ्या मित्राचे नाव दिसले. आॅपरेशनही मी जे ठरविले होते तेच होते, परंतु सर्जन मात्र दुसरा होता. तुझे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत, तू माझे अगदी अचूक निदान केलेस, माझ्यासाठी तू देवच आहेस म्हणणारा माझा हा मित्र आॅपरेशन मात्र दुसºया देवाकडून करून घेत होता.
माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. त्या खरेतर आर्थिक नुकसानीमुळे नव्हत्या किंवा माझा इगो दुखावला गेला असल्याने नव्हत्या तर त्या होत्या आपल्या एका जवळच्या मित्राने आपल्याला डावलल्याच्या भावनेमुळे. साधारणपणे एक महिन्याने या मित्राचा मला फोन आला. मला थोडे बरे वाटले. म्हटलं, ठीक आहे. आता तरी तो मला सांगेल, त्याने असे का केले ते? पण त्याने फोन वेगळ्याच कारणासाठी केला होता. माझ्याकडे जे उपचार केले होते त्याचे त्याला बिल वाढवून पाहिजे होते, क्लेम करण्यासाठी. आता मात्र हद्द झाली. मी शांतपणे ते जमणार नाही, हे सांगून फोन बंद केला. यालाच कदाचित म्हणत असावेत गरज सरो, वैद्य मरो.-डॉ. सचिन जम्मा(लेखक लॅप्रोस्कोपी सर्जन आहेत)