मंगळवेढा - सोलापूर जिल्हयात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढून त्यात अनेक जीव जात आहेत. हे अपघात रोखण्यासाठी जिल्हयातील अपघाताच्या ठिकाणाची जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाकडून नुकताच सर्व्हे सुरु असून या पथकाने सोलापूर ते कोल्हापूर या महामार्गावरील सोलापूर ते सांगोल्यापर्यंत अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केली. दरम्यान जिल्हयातील सर्व अपघात ठिकाणांची पाहणी केल्यानंतर याचा अहवाल रस्ता सुरक्षा कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर केला जाणार असल्याचे अपघात सर्व्हेक्षण पथकाकडून सांगण्यात आले.
देशात व महाराष्ट्रात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वर्षाकाठी हजारोंच्या संख्येने नाहक लोकांचे जीव बळी जात आहेत. मृत्यूच्या व जखमींच्या आकडयात दिवसेंदिवस भर पडत असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी होवून सुप्रिम कोर्टाने प्रत्येक जिल्हयात अपघाताचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार सोलापूर जिल्हयात सन 2017 ते 2019 दरम्यान झालेल्या अपघात स्थळांचा सर्व्हे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते व अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक धनंजय जाधव, पोलिस हवालदार डिंगरे, येळनोरे, पोलिस शिपाई शिवाजी सोनवले यांच्या पथकाने मंगळवारी सोलापूर ते उजनी (भिमानगर) या दरम्यान असलेल्या 28 अपघात स्थळांची तर बुधवारी सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील सोलापूर ते सांगोला सात ब्लॅक स्पॉट ठिकाणाचा सर्व्हे केला.
अपघातग्रस्त ठिकाण पुढीलप्रमाणे......
करमाळा राष्ट्रीय महामार्ग क्र.561 वरील देवळाली, मांगी पुलाचे वळण, मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्र.65 वरील सावळेश्वर दर्गा, अर्जूनसोंड फाटा, लांबोटी सैनिक चंदन नगर वडवळ फाटा,कन्या प्रशाला चौक, नरखेड क्रॉस रोड, कचरे पेट्रोल पंप, यावली क्रॉस रोड,अनगर फाटा, चिखली टॉवर,हिवरे फाटा, तेलंगवाडी, शेटफळ माढा फाटा, मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील कचरेवाडी फाटा,आंधळगाव, मंगळवेढा शहर बोराळे नाक्याजवळ, माचणूर ते ब्रम्हपुरी रोडवर, कामती महामार्ग क्र. 465 कोरोवली चौक कॉर्नर, परमेश्वर पिंपरी ते कुरुल, वाघोली शिवार आदी ठिकाणाला या पथकाने भेट देवून अपघात स्थळांची पाहणी करीत तेथील नागरिकांची मते जाणून घेतली.अपघात रोखण्यासाठी अपघातस्थळी विविध सिम्बॉल व फलक लावून प्रयत्न केले जाणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.