सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने केलेल्या पाहाणीमध्ये मला ५२ टक्के मते मिळाली; काठावर पास झालो; पण तरीही मला मिळालेली पसंतीचे मते कमी आहेत, असे पक्षाला वाटले. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही, असे मावळत्या लोकसभेतील सोलापूरचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अॅड. बनसोडे म्हणाले, मला जरी उमेदवारी मिळाली नाही, तरी डॉ. जयसिध्देश्वर निवडून यावेत, अशी माझी इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसºयांदा पंतप्रधान झालेले मला पाहायचे आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघात मी ज्यांची ज्यांची कामे केली आहेत. ते माझे स्नेही आहेत. त्यांना भाजपला मतदान करावे, असे मी व्यक्तीश: आवाहन करणार आहे.
तथापि भाजपने अद्याप मला प्रचाराची कोणती जबाबदारी दिली नाही. ती दिल्यास मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापुरात येण्यास तयार आहे. खरं तरं आजच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. माझ्याकडील प्राप्तीकर खात्याची कामे आटोपल्यानंतर मी प्रचारात सक्रिय होण्यास सज्ज असल्याची त्यांना कल्पना दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
मोहोळचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांनी बनसोडे यांचे पक्षात स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादीत जाणार का?.. या प्रश्नावर अॅड. बनसोडे म्हणाले की, मी त्या पक्षात जाणार असे म्हणालो नाही. हे त्यांचे व्यक्तीगत विधान आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. मी भाजपाबरोबरच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, सन २०१४ मध्ये मला उमेदवारी नको होती. तशी मागणीही केली नव्हती; पण मला लढण्यास सांगण्यात आले होते असे ते म्हणाले.