येत्या २ ते ३ महिन्यांत या योजनेचे संपूर्ण सर्वेक्षण होऊन आराखडा अंतिम केला जाणार आहे. यामुळे या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून शासनाकडून मंजुरी मिळण्याची कार्यवाही सुरु झाल्याची माहिती आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेले उजनीचे २ टीएमसी पाणी सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २२ गावांना देण्याच्या कामाला सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु आजपर्यंत या कामाला सुरुवात झाली नसल्याने व सदरची प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याने या योजनेचे भविष्य अंधारात होते.
आ. शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा सदस्य झाल्यापासून या योजनेला मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन व समक्ष भेटून पाठपुरावा केला होता.
या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचे सर्वेक्षण करून प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात २५ मे रोजी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी आ. शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या आराखड्याबाबत सूचना करण्यासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीमध्ये आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील इतर कोणत्याही योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, नवी लोटेवाडी, जुनी लोटेवाडी, अजनाळे, खवासपूर, कटफळ, इटकी, यलमर-मंगेवाडी, लक्ष्मीनगर, चिकमहूद या १२ गावांचा समावेश करून उर्वरित पाणी २२ गावातील शेतकऱ्यांना देण्याची तरतूद करण्याची सूचना मांडली.
यावर मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी रुपयांच्या निधीची त्वरित तरतूद केली असून सर्वेक्षणाची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, उप अभियंता ए. के. सुरनीस, यांच्यासह माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ उपस्थित होते.
कोट :::::::::::::::
विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी मतदारांना दिलेल्या आश्वासनानुसार सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. यासाठी मी कटिबद्ध आहे. सांगोला तालुक्याच्या हक्काचे २ टीएमसी उजनीचे पाणी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
- ॲड. शहाजीबापू पाटील
आमदार, सांगोला