सोलापूर: सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर मुंबईत केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आशीष दुआ, सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना कोपऱ्यातील खुर्ची ठेवल्यामुळे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील निघून गेले होते. या वादाचे पडसाद शनिवारी मुंबईच्या बैठकीत उमटले. नरोटे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक वातावरण होते. पुलवामा हल्ल्यानंतर यात बदल झाला.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपचे खासदार आणि दोन आमदारांबद्दल नाराजी आहे. या नाराजीचा पक्षाला फायदा होऊ शकतो. सोलापूर मतदारसंघाचे नेतृत्व सुशीलकुमार शिंदे यांनीच केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार त्यांनीच ठरवावा. पण सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना इथे किंमत दिली जाते. आम्ही आमच्या मनाचे बोलत नाही. शहरात जी चर्चा आहे तेच बोलत आहे. तालुकाध्यक्ष निवडीत जे झाले ते पुन्हा व्हायला नको, असेही नरोटे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज द्याराष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आघाडीचा धर्म पाळला जात नाही. कॉंग्रेसमधील काही लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. आम्ही राष्ट्रवादीचे लोक घेतले तर आघाडीच्या धर्माची आठवण करुन दिली अशी शहरातील काँग्रेस नेत्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आघाडी हवी असेल तर आघाडीचा धर्म पाळायला सांगा, असे नरोटे म्हणाले. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात नरोटे यांच्या राष्ट्रवादीबद्दल मतांना दुजारो दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याचे सांगण्यात आले.