सोलापूर : भाजपातर्फे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांची सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी फायनल झाली तर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे माघार घेतील, अशी शंका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या हालचालींबाबत निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, सध्या राजकीय परिस्थिती बदलेली आहे. आम्ही विकासकामाची पावती घेऊन लोकांपर्यंत जात आहोत तर काँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खूश करीत आहेत, पण आता जनता हुशार आहे.
तुम्ही काय काम केले ते आधी सांगा, असा जाब विचारला जात आहे. काँग्रेसकडे ६० वर्षे सत्ता होती. या काळात काँग्रेसला शहराचा विकास करता आलेला नाही. तीच ती कामे केल्याचे लोकांना सांगितले जात आहे. तुम्ही खरेच काम केले असते तर ही पाळी आली नसती.
सध्या देशभरात राजकीय हवा बदललेली आहे. भाजपामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इतर पक्षात निवडून येण्याची खात्री नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चित्र असेच आहे. भाजपातर्फे जर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी दिली गेली आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी जर सोलापुरातून निवडणूक लढविली तर मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीला उभे राहील की नाही, ही शंकाच असल्याचे मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता व्यक्त केली.
ही वेळ का आली- आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमाबाबत केलेल्या आरोपाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही जर कामे वेळेवर केली असती तर ही वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी केला. मोहिते-पाटील यांच्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. आता भविष्यात याचे परिणाम दिसून येतील.