सोलापूर : वकिलांनी न्यायालयात न घाबरता वादविवाद करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने सोलापूरकरांचा उर भरून येतो. चार हुतात्मा यांच्या पद्धतीने सोलापूरचे चार रत्न…उदय लळित, विनय जोशी, एन.जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी आहेत. सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील, मागास समाजातील वकिलांनी मदत करावी. जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या वतीने सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. दरम्यान, ॲड. थोबडे यांनी प्रास्ताविकातून बार कौन्सिलची माहिती आणि कार्याचा आढावा घेतला. बार कौन्सिलतर्फे शिक्षण, कार्यक्रमांची शिबीरे घेऊन नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 15 वर्षात 500 शिबीरे घेतली, ज्यांना बार आणि बेंचची आवड त्यांना मार्गदर्शन केले. महिला दिनाला महिलांविषयी गुन्हे याबाबत शिबीर घेऊन जागृती केली. बार कौन्सिलचे डिजीटायजेशन केले असून सर्वांना यामार्फत सेवा दिली जाणार आहे, असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ई-गव्हर्नन्सचे प्रकाशन केले. लळित यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजीटायजेशनचे कळ दाबून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी लळित कुटुंबातील सदस्य सविता लळित यांनी लळित कुटुंबातील चार पिढ्या वकिलीमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, सरन्यायाधीश यांचे वडील निवृत्त न्यायमुर्ती उमेश लळित, पत्नी अमिता लळित, श्रीमती झूमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आदींसह वकिल उपस्थित होते.
-------------------
पैशासाठी वकिली करू नका-आशितोष कुंभकोणीसोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्तीचे, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे सरन्यायाधीश लळित आहेत. त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये, पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन कुंभकोणी यांनी केले.