संतोष आचलारे
सोलापूर: सतराव्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, येत्या दोन दिवसात होत असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्हीसीसाठी उमेदवारांचा आतापर्यंत झालेल्या खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाने बनवला आहे. छाया नोंदवहीनुसार आघाडीच्या उमेदवाराचा खर्च सर्वाधिक ४३ लाख ३0 हजार रुपये झाला आहे तर युतीच्या उमेदवाराचा खर्च त्या खालोखाल २६ लाख ६३ हजार रुपये झाला आहे. दरम्यान, खर्चाच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीही मागे नसून, त्यांचा खर्च हा १९ लाख ६ हजार रुपयांच्या घरात गेला आहे.
दुसरीकडे उमेदवारांनी सादर केलेला खर्च हा छाया नोंदवहीतील नोंदीच्या तुलनेत जवळपास निम्मा आहे; मात्र उमेदवारांचा वाहनावरील खर्च तथा अन्य तत्सम खर्च निवडणूक विभागाने नोंदवल्यामुळे छाया नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आहे; मात्र अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येईल, असे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ प्रमाणेच यंदाही ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारंना १० हजार रुपयापर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे.
यापेक्षा होणारा अधिकचा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे. दरम्यान, ५ एप्रिल, ८ एप्रिल या २ तारखांना निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या १३ उमेदवारांना त्यांचा खर्च सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.
आता पुन्हा उर्वरित खर्च उमेदवारंना सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर निर्धारित कालमर्यादेत निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे प्रतिज्ञापत्रही खर्च निरीक्षकांना सादर करावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक खर्च निरीक्षक त्यांच्या खर्चाची तपासणी करतील.
अपक्षाला नोटीसनिवडणुकीसंदर्भात खर्च सादर करण्यासंदर्भातील दोन बैठकांना उपस्थित नसलेल्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील राज्याचा रहिवासी असलेल्या एका उमेदवाराला जिल्हा निवडणूक विभागाने त्यांनी त्यांचा खर्च सादर न केल्याप्रकरणी नोटीस बजावली असल्याची माहिती आहे.
वाहनांवरील खर्च जादाउमेदवारांचा प्रामुख्याने वाहनावरील खर्च तूर्तास जादा असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी असलेले युतीचे उमेदवार जयसिध्देश्वर महाराज यांच्या प्रचारासाठी , आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी रोज वाहनांची संख्या वाढतच आहे. पक्ष स्तरवरूननही प्रचार वाहन लावण्यात आले आहेत.
गतवेळी ९० लाखांचा खर्च२०१४ च्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये १६ उमेदवार होते. या १६ उमेदवारांचा निवडणुकीच्या १८ दिवसांच्या कालावधीमधील खर्च हा एकत्रितरित्या ९० लाख रुपये झाला होता. यात युतीच्या उमेदवाराचा ३० लाख तर आघाडीच्या उमेदवाराचा ४४ लाख रुपये खर्च झाला होता. दहा उमेदवारांचा खर्च हा एक लाख रुपयांच्या आत होता.