सोलापूर : काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत पाच जणांना प्रवेश असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांना प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. कार्यालयात पोहोचल्यावर शिंदे यांना चष्मा विसरल्याचे लक्षात आले. ही बाब निदर्शनाला आल्यावर त्यांनी चालकाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात कुणीकडून यावे या गडबडीत पिशवी घेऊन चालक धावत आला. प्रवेशद्वारावर पिशवीतून चष्मा शोधून शिंदे यांना पोहोच करण्यात आला.
भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे दुपारी सव्वादोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. अर्ज भरताना त्यांना बँकेचे पासबुक विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी बुळ्ळा यांच्याशी संपर्क साधला. गाडीतून पासबुक घेऊन बुळ्ळा धावतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेथून शिवाचार्य यांना पासबुक पोहोच करण्यात आला. प्रवेशद्वारावरील पोलीस प्रत्येक बाबीची कसून तपासणी करीत होते.
जुन्या नोटा घेऊन आला उमेदवारमला उमेदवारी दाखल करायची आहे, असे सांगत अनिल उर्फ पप्पू पांढरे हा इसम आरडाओरडा करीत आला. पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलिसांनी त्याला अडविले. त्याने गोंधळ करण्यास सुरुवात केली. हातातील अर्ज व कॅरीबॅगमध्ये असलेल्या चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या हजाराच्या नोटांची बंडले त्याने दाखविली. ही माझ्या वडिलांची कमाई आहे. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहे, असे सांगताच पोलीस त्याला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन आले. पण त्याच्याजवळील नोटा जुन्या असल्याचे लक्षात आल्यावर त्याला आल्या पावली पोलिसांनी परत पाठविले.