सुशीलकुमार शिंदेंना ३७ लाखांची देणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:50 PM2019-03-26T14:50:17+5:302019-03-26T14:53:15+5:30
सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे.
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सन २०१४ मध्येही लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेले उत्पन्न ५७ लाख ९१ हजार १८० रुपये तर पत्नी उज्ज्वला यांचे उत्पन्न ६ लाख २४ हजार ४१० रुपये इतके असल्याचे नमूद केले होते. आता सन २०१७-१८ मध्ये शिंदे यांनी वार्षिक उत्पन्न ७९ लाख ६० हजार ४८० तर पत्नीच्या नावे १ कोटी २ लाख ३२ हजार ८८० रुपये असल्याचे नमूद केले आहे.
शिंदे यांच्या बँक खात्यात १ लाख ६० हजार तर पत्नीच्या खात्यात ५० हजारांची रोकड आहे. शिंदे यांच्या नावे २ लाख १० हजार तर पत्नीच्या नावे १० लाख ९६ हजारांची गुंतवणूक आहे. शिंदे यांच्या नावे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ३० हजारांचे शेअर्स आहेत. तसेच एनएसएसमध्ये ४० हजार तर पीपीएफमध्ये ७५ लाख १४ हजार स्वत:च्या तर १७ लाख ७९ हजार पत्नीच्या नावे डिपॉझिट आहेत.
फॉर्च्युनर, ट्रॅक्टर, टेम्पो
- शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्पो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ एकर (आज बाजारभाव किंमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्ज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किंमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्ज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फार्महाऊस व एरंडवणे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे. अशाप्रकारे शिंदे यांच्या नावे असलेल्या संपत्तीची किंमत ९ कोटी ९६ लाख तर पत्नी उज्ज्वला यांच्या नावे १० कोटी ११ लाख आहे.
९५५ ग्रॅमचे दागिने
- शिंदे कुटुंबीयांकडे ३१ लाख ८९ हजारांचे ९५५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आहेत. यामध्ये शिंदे यांच्याकडे सोनसाखळी व अंगठी ४० ग्रॅमची आहेत. पत्नी उज्ज्वला यांच्याकडे नेकलेस, गंठण, बांगड्या आणि रिंग असे ९१५ ग्रॅमचे दागिने आहेत. शिंदे यांच्या नावे एकही गुन्हा किंवा न्यायालयात खटला नाही. शिंदे यांनी ३७ लाख ५० हजार व पत्नीच्या नावे १० लाखांचे कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे.