सोलापूर : लोकशाही पद्धतीने होणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची पक्षांतर्गत निवडणूकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रदेश प्रतिनिधींनी मुंबईत मतदान केले.
एकिकडे भाजप दडपशाही करुन लोकशाही संपवू पाहतोय तर दुसरीकडे या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष, लोकशाही देणारा पक्ष, देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा कॉंग्रेस पक्ष भारत जोडो यात्रा काढून आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाची पक्षांतर्गत निवडणूक लोकशाही पद्धतीने घेऊन काँग्रेस पक्ष देश आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय कारण लोकशाहीचे रक्षण हाच काँग्रेसचा विचार आहे. आज देशभरात अध्यक्षपदासाठी ठिकठिकाणी मतदान सुरु आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन मुंबई येथील मतदान केंद्रावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी (मतदार) सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, शहर उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे, यांनी मतदान केले. तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रदेश प्रतिनिधी मतदारांनीही मतदान केले.