सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही असे उत्तर दिले आहे.
सोलापूर लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे धनगर समाजाचा मेळावा झाला. यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे उत्तर दिले. दोन दिवसापूर्वी शिंदे यांची त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एका हॉटेलात भेट झाली होती.
या भेटीमध्ये उभयतांमध्ये घडलेली राजकीय चर्चा व फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात. पण त्याचं राजकारण करणं काँग्रेसलाच जमतं,' अशी टिप्पण्णी केली होती.
आंबेडकर यांच्या या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी या भेटीदरम्यान घडलेला घटनाक्रम स्पष्ट केला. त्या दिवशी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील सोलापूर दौºयावर आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर लिफ्टमध्ये नगरसेवक आनंद चंदनशीवे यांची भेट झाली. त्यावेळी चंदनशीवे यांना इकडे कुठे असे विचारल्यावर त्यांनी आंबेडकर येथेच असून ब्रेकफास्ट घेत आहेत अशी माहिती पुरविली. त्यामुळे मी तिथे गेलो. त्यावेळेस तेथे फक्त त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांनी फोटो काढले. ते फोटो आम्ही व्हायरल केलेले नाहीत. आंबेडकर ज्या तऱ्हेने बोलले तशी आमची संस्कृती नाही. आम्ही गाढव किंवा दुसरा शब्द वापरणार नाही, त्यामुळे लोकांनी समजून घ्यावे असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.
नामविस्तारात घोळ घातलाभाजपावाल्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फसवणूक केल्याचा आरोप नगरसेवक चेतन नरोटे यांनी केला. विद्यापीठाच्या नामविस्ताराच्यावेळेसही रडक्याचे डोळे पुसण्यासारखे करून समाजाची दिशाभूल केली गेली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे दोन्ही समाजाला विश्वासात घेण्याचे काम होते. पण त्यांनीच नामांतरला खो घालण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी बाळासाहेब शेळके, माजी महापौर अरुणा वाकसे, शैलेश पिसे, संतोष वाकसे, महेश पाटील,वसंत पाटील, बाळासाहेब ठेंगील, विजया पाटील उपस्थित होते.