काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीत सुशिलकुमार शिंदेंना डावलले, सोलापूर समर्थकांची निर्दशने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:20 PM2018-07-19T13:20:54+5:302018-07-19T13:22:44+5:30
सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना या कार्यकारणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापूरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निर्दशने केली़ यावेळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते़
राहुल गांधी यांची टीम खूप चांगली - सुशिलकुमार शिंदे
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी मंगळवारी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत दिग्विजयसिंह, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठांना वगळण्यात आले आहे. याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ‘नो कॉमेंटस्’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर या अनौपचारिक गप्पांमध्ये पक्षाने आपल्याला खूप दिले आहे. आता काहीही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांची टीम खूप चांगली असून आगामी काळात या टीमकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
महाराष्ट्रातून पाच जणांना कार्यकारणीत दिले स्थान
या कार्यकारणीत महाराष्ट्रातून पाच जणांना यात स्थान देण्यात आले असून प्रामुख्याने मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जम्बो कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे.
यात १० युवा नेत्यांना प्रथमच कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. २३ सदस्यांच्या या कार्यसमिती सदस्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चांडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, सैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, टी.साहू, रघुवीर मीना, गईखंगम, अशोक गेहलोत यांचा समावेश आहे.