सोलापूर : कुमठा नाका येथे मंगळवारी रात्री प्रचंड पोलीस बंदोबस्तात काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार सभा झाली.
काँग्रेसतर्फे कुमठा नाका येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सभा घेण्यास काहींनी आक्षेप नोंदविल्याने पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला. रात्री साडेनऊ वाजता उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे सभास्थानी आगमन झाले.
यावेळी बोलताना शिंदे यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष वेधले. विरोधक माझ्यावर टीका करतात पण पाच वर्षांत त्यांना पाणीप्रश्न सोडविता आला नाही. महापालिकेला वेठीला धरले. लोक हैराण असताना सत्ताधाºयांनी काय केले असा सवाल त्यांनी केला. सोलापूरचा पाणीप्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर शहराजवळ एक नवीन धरण बांधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपवाल्यांकडे व्हिजन नाही. तरुण पिढी शिक्षणासाठी पुणे, हैदराबाद. बंगळुरूकडे जात आहे. पण भाजपवाल्यांना याचे काहीही वाटत नाही. पाच वर्षांत सोलापूरचे विमानतळ व बेरोजगारीचा प्रश्न यांना सोडविता आला नाही, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिंदे यांनी टीका केली. मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताना लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकविले त्यावेळी बरे वाटले होते. पण संसदेत गेल्यावर पाच वर्षांत त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून हुकूमशाही राजवट राबविली. नोटबंदी, रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर बदलला, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात. नोटाबंदीनंतर आतंकवाद संपेल असे मोदी यांनी म्हटले होते, पण पुलवामामध्ये काय घडले. काश्मीरचा प्रश्न मोदी यांना सोडविता आला नाही.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी यांची भाषणे झाली. सभेला नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, देगील, भीमाशंकर टेकाळे, भाग्यश्री कदम,लता गुंडला, फुलसिंग पवार, मोहसीन शेख, रवी व्हटकर, पप्पू देवकर, देवेंद्र भंडारे,सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.