सोलापूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यूएनजीएच्या बैठकीत बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. इम्रान खान यांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम केल्याबद्दल शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.
भाजपच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी सायंकाळी युवक प्रज्ञावंत कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० या विषयावरील मेळाव्यात चर्चा करण्यात आली. डॉ. पात्रा म्हणाले, यूएनजीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या विषयाचा उल्लेख केला नाही. कारण तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे संपूर्ण भाषण भारताच्या विषयावर होते. इम्रान खान आपल्या भाषणात म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात दहशतवादी तळ चालवित असल्याचे मत काँग्रेसच्या गृहमंत्र्याने व्यक्त केले होते. सुशीलकुमार शिंदे हे सर्व ऐकत असतील. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. पण या भूमीतील नेत्याची वक्तव्ये शाहिस्तेखान वाचू लागले आहेत. शाहिस्तेखानला ऑक्सिजन आणि दारुगोळा पुरविण्याचे काम सोलापूरचे माजी खासदार करीत आहेत. याबद्दल त्यांनी महाराष्ट्र ची माफी मागायला हवी.
यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी देशात समान नागरी कायदा केव्हा येईल, असा प्रश्न विचारला. भाजप लोकशाही मार्गाने हा विषय पूर्ण करणार असल्याचे संबित पात्रा यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने पक्षातून ३७० कलम हटविलेएक देश पण दोन प्रधान आणि दोन निशाण हे या देशात चालणार नाही, ही जनसंघ आणि भाजपची भूमिका राहिली आहे, असे सांगून संबित पात्रा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. पात्रा म्हणाले, राष्ट्रवादीत जे घडतेय तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. या पक्षात दोन झेंडे असतील, असे मत अजित पवार यांनी मांडले होते. पण एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशाण चालणार नाहीत, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. शरद पवारांनी आपल्या पक्षातून ३७० कलम हटविले आहे. पण त्यांचा पक्ष काश्मीरच्या ३७० कलम विषयापासून स्वत:ला दूर ठेवत आहे.