सोलापूर : ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी करण्यासाठी गाव तिथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी शंभर गावांमधील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात डॉक्टर असलेल्या दोन सरपंचांनी आपल्या गावात कोविड सेंटर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली.
ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने शहराकडे रुग्ण येत आहेत. शहरात बेड मिळत नसल्याने अनेकांची ससेहोलपट होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्येच २५ बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांच्या तयारीसाठी त्यांनी सोमवारी सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून दिली. कोविड सेंटरसाठी गावातील मोठ्या हॉलची निवड करून तेथे शौचालय, सांडपाणी, पिण्याचे पाणी व दिवाबत्तीची सोय करावी, अशा सूचना दिल्या.
...तर हॉस्पिटलला पाठवणार
कोरोनाची लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना याठिकाणी दाखल करायचे आहे. या कोविड सेंटरमुळे रुग्णांची आपल्या गावातच सोय होईल. घरचे जेवण देता येईल. रुग्णही नातेवाईक व डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील. यामुळे जाण्या - येण्याचा खर्च वाचेल. तसेच लक्षणे गंभीर झाल्यास लगेच पुढे हॉस्पिटलला रेफर करता येईल. कोविड सेंटरसाठी जिल्हा परिषदेतर्फे औषधे पुरवली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.
डॉक्टरांनी दाखवला पुढाकार
यावेळी मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी गावच्या कोविड सेंटरची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली. मला औषधे द्यावी, गावातील लोकांची मी सेवा करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जिल्हा परिषदेतर्फे औषधांचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले. यावेळी स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, जावेद शेख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद उपस्थित होते.