काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदार दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर आता त्यांच विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सुनील केदार यांच्यावर जी कारवाई घाई गडबडीत झाली. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी आणि खासदार नवनीत राणा यांच्यावरदेखील कारवाई करावी त्यांचे सदस्यत्व ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनीत राणा आणि डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी महाराज यांनी राखीव जागेतून निवडणुकीत विजय संपादन केला आहे. काही महिन्यांत दोघांच्याही जातीच्या दाखल्यावर हरकत घेण्यात आली होती. जातपडताळणी समितीने दोन्ही खासदारांचे जातीचे दाखले रद्द केले आहेत, मात्र, आजतागायत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते मनोज उर्फ काकासाहेब कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्यावर ज्या प्रमाणे आमदारकी रद्दची कारवाई झाली. त्याप्रमाणे भाजपच्या या दोन्ही खासदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.