या प्रकरणात कंत्राटी कर्मचारी सचिन साळुंखे हे विजेचा झटका बसून मयत झाले होते. त्यानंतर त्यासंदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली आहे.
९ जानेवारी रोजी दोन वाजण्याच्या सुमारास कंदर परिसरातील रोहित्राची दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर अधिकृत परवानगी घेऊन डीपीवर चढल्यानंतर सचिन साळुंखे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वरिष्ठ अधिकाऱ्याला घेरले होते. त्यानंतर करमाळा पोलिसात मंडलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर इतर बाबी समोर आल्या आहेत.
संबंधित दिवशी मंडलिक हे कामावर असताना कंदर उपकेंद्रातून अकरा केव्ही इन्कमर नंबर २ ट्रीप करून संबंधित अकरा केव्ही बिटरगाव शेती पंप मीटरचा व्हिसीबी बंद करणे आवश्यक होते. व त्याचा नियमाप्रमाणे इतर बाबी करून विद्युत पुरवठा बंद करण्याचे काम मंडलिक यांचे होते. कामात कुचराई केलीच शिवाय लॉग बुकवरील नोंदी मध्येही खाडाखोड करून नोंद केलेली आहे. यंत्रचालक म्हणून जबाबदारी पूर्ण न केल्याने तसेच खाडाखोड व नियमांचे उल्लंघन केल्याने प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे मंडलिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मंडलिक यांना निलंबित करून ५० टक्के मूळ वेतन देण्यात येणार आहे. त्या शिवाय महागाई भत्ता घरभाडे व इतर बाबी दिल्या जाणार आहेत. त्या शिवाय आठवड्यातून दोन दिवस मुख्य कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केली आहे.