पंढरपूर (जि़सोलापूर): स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती आणि कोणत्या ठिकाणच्या त्या नंतरच कळेल, असे सांगून खा़ नारायण राणे यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे़ वाडीकुरोली (ता़ पंढरपूर) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़
राणे म्हणाले, शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो़ परंतु नेत्यांच्या आश्वासनाने आणि घोषणेने त्यांचे पोट भरत नाही तर कृती केली पाहिजे़ सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कालपरवापर्यंतएकमेकांवर टीका कारणारे सेना-भाजपा आज गळ्यात गळा घालून युती करून निवडणुका लढविणार आहेत़ मात्र त्यांची खेळी जनतेच्या लक्षात आली आहे़, असे त्यांनी सांगितले़
दरम्यान, शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष असून त्यांच्या नेत्यांनी युती करून स्वत:चीच फजिती करून घेतली. भाजपा वाल्यांनी सांगितले असेल की आता सडवणार नाही. यामुळे जनतेसाठी नाही मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झाल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. ही मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत. कित्येक प्रकल्प मातोश्रीच्या भागीदारीवर सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना फक्त 10 जागा जिंकेल असे भाकितही राणे यांनी केले.