पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून उद्योजक समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीची घटक पक्ष असल्याने सचिन पाटील यांची उमेदवारी माघारी घेतली जाईल, असे मानले जात होते. मात्र आज स्वाभीमानीने त्यांना एबी फॉर्म दिल्याने अर्ज माघारी घेण्याच्या आशा मावळल्या आहेत.
आज पंढरपूर येथे महाविकास आघाडीच्या पहिल्याच प्रचार सभेला स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे मंचावर उपस्थित होते. आणि त्यांनी भाषणही केले. त्याचवेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले आज सकाळी राजू शेट्टी यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले होते. मात्र स्वाभिमानीने आपला ए बी फॉर्म सचिन पाटील यांना दिला असून आज पाटील यांनी तो फॉर्म आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडला आहे.
४ एप्रिलपासून राजू शेट्टी स्वतः मतदारसंघात गावोगावी प्रचारसभा घेणार आहेत, असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी सांगितले आहे. स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातून स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी येणार असल्याचेही तानाजी बागल यांनी सांगितले. आज महाविकास आघाडीच्या मंचावर जे स्वाभिमानीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते त्यांच्याबाबत राजू शेट्टी हेच योग्य तो निर्णय घेतील, असेही बागल म्हणाले. यावरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.