अरुण बारसकर
सोलापूर : प्रवेशद्वारापासून काही अंतर आतमध्ये गेले की सुरू होते दलदल अन् खड्डेमय रस्ता. कांदा बाजारातील एकमेव रस्ता सोडला तर सगळीकडे रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र आहे नामांकित अशा सोलापूरबाजार समितीमधील.
सोलापूर बाजार समितीत कांदा, डाळिंब, बेदाणा यासह संपूर्ण फळपिके, भुसारची विक्री होते. कांदा विक्रीत राज्यातील पहिल्या बाजार समितीत सोलापूर बाजार समितीची गणना होते. उत्पादनातही आघाडीवर असलेल्या बाजार समितीला मूलभूत सुविधा देण्यासाठी वेळ नाही. पिण्याचे पाणी, शौचालये, स्वच्छतागृह तसेच रस्त्यांची सुविधा नसल्याचे चित्र आहे. बाजार समितीतील प्रवेशद्वारातून प्रवेश केला की काही अंतरापासून सुरू होते दलदल अन् चिखल. या प्रमुख रस्त्यावरुन सहज वाहन चालविणे किंवा पायी जाण्यासाठीही चांगला रस्ता नाही. पाऊस पडला की या रस्त्यावर जाण्यासाठी कसरत ठरते. अंतर्गत रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खाचकळगे अन् चिखल झाल्याने डासाच्या उत्पत्तीला बळ मिळत आहे. ही स्थिती संपूर्ण बाजार समितीतील आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील दुकानदार येथून धान्याची खरेदी करतात. एवढी मोठी भुसार बाजारपेठ मात्र एकही रस्ता चांगला नसल्याने बाजार समितीच्या कारभारावर तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
फूल की चिखल बाजार...- बाजार समितीच्या आवारात विविध प्रकारची फुले विक्री करण्यासाठी १६ गाळे आहेत. या गाळ्यासमोरचा रस्ता कधी झाला हे आठवतही नसल्याचे व्यापारी सांगतात. वरचेवर खड्डे वाढत असल्याने त्यात पावसाचे पाणी साठते. त्यामुळे अधिक घाण होते. बाजार समिती काहीच उपाय करीत नसल्याने व्यापाºयांनी स्वत: खर्च करून मुरुम टाकून घेतला आहे. तरीही घाण काही बंद झाली नाही. यावरच देवदेवतांना जाणाºया फुलांची विक्री होते.
रस्ते व ड्रेनेजची कामे संचालक सभेत मंजूर केली होती; मात्र पणन मंडळाने अंदाजपत्रके जादा रकमेची असल्याने मंजुरी दिली नाही. आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अंदाजपत्रके तयार करून घेण्यात येत आहेत. पणन खात्याची मंजुरी घेऊन कामे सुरू केली जातील.- मोहन निंबाळकरसचिव, बाजार समिती
खड्ड्यामुळे त्रास होत असल्याने आम्हीच मुरुम भरुन घेतला.खड्ड्यात साठलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. चिखल होत असला तरी फुले विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. फूल बाजारासाठी मुतारी, पिण्याच्या पाण्याची सोय व रस्ता नाही. खेड्यापाड्यातील रस्ते यापेक्षा चांगले आहेत.सागर घोडकेफूल विक्रेते, सोलापूर बाजार समिती
संशयास्पद अंदाजपत्रके करावी लागली रद्द- मागील वर्षी बाजार समितीमधील रस्ते व गटारीच्या कामासाठी ४४ कोटी खर्च करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. सध्या पॅनलवर नसलेल्या शाखा अभियंत्यांनी अंदाजपत्रके फुगवून केली होती. यामुळे पणन मंडळाने ही अंदाजपत्रके मंजूर केली नाहीत. सभापती विजयकुमार देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्याला बोलावून १२ कोटी रुपयांची अधिक अंदाजपत्रके रद्द केली, तुम्ही नव्याने अंदाजपत्रके तयार करा अशा सूचना दिल्या. यामुळेही रस्ते करण्यास विलंब झाला आहे.