कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील सापटणे (भो.) च्या सरपंचपदी स्वाती हनुमंत गिड्डे यांची तर उपसरपंचपदी रोहिणी किसन राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर महिलाराज आले असून नऊपैकी पाच सदस्य महिला आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच पदावर पॅनल प्रमुखांनी महिलांना संधी दिली आहे.
सापटणे गावाने तालुक्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामुळे तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील स्थानिक नेतेमंडळीसह माढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याविषयी गावकऱ्यांचे प्रबोधन केले होते.
यावेळी माजी सरपंच हनुमंत गिड्डे, कुस्तीसम्राट अस्लम काझी, युवराज राऊत, धर्मराज पाटील, संग्राम गिड्डे, बबन पाटील माऊली गायकवाड, सचिन रणदिवे, बाळू बागल, नसीर शेख, महादेव गिड्डे, संतोष गोरे, बिभीषण राऊत, बंडू गोरे तर नूतन ग्रामपंचायत सदस्य बालाजी गिड्डे, राजेंद्र भालेराव, बालाजी अवचर, अनिता मुसळे दीपाली गिड्डे, बाळू माळी, जयश्री गोरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
.......
फोटो : ०९ सापटणे
सापटणे (भो.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती गिड्डे तर उपसरपंचपदी रोहिणी राऊत यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना माजी सरपंच हनुमंत गिड्डे व नूतन सदस्य.