सोलापूर : मंदिर परिसरातील ध्वनिक्षेपकांवरुन पहाटेपासून कानी पडणारा ओम नम् शिवाय: चा मंत्र... भल्या पहाटेच दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांमध्ये शिवयोगी श्री सिद्धरामांचा जयजयकार...सूर्याचा उदय झाला अन् इकडे योग समाधी आणि मंदिरातील गाभाऱ्यात ‘बोला बोला, एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ...च्या जयघोषात अभिषेक करण्यात आला. दिवसभर मानाच्या सातही नंदीध्वज मिरवणुकीत पांढºया शुभ्र बाराबंदी पोषाखात सहभागी झालेल्या नंदीध्वजधारकांसह हजारो भक्तगणांच्या साक्षीने तैलाभिषेकाचा सोहळा पार पडला. १८ किलोमीटरच्या नंदीध्वज मिरवणुकीच्या सोहळ्याने तरुणाईची शक्ती अन् भक्तीचा संगमही जुळवून आणला.
सोमवारी पहाटेपासूनच हळदीसाठी हिरेहब्बू वाड्यात वºहाडी जमली. ८ वाजता मानाचे सातही नंदीध्वज वाड्यासमोर दाखल झाले. पूजन आणि महाआरती झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज तर त्यापाठोपाठ पंचरंगी ध्वज फडकत होता. या दोन्ही ध्वजाच्या मागे पालखी सोहळा होता. पहिला विसावा मार्कंडेय मंदिराजवळ घेण्यात आला. तेथून शासकीय आहेर घेण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिर परिसरातील ६८ लिंगांचा तैलाभिषेक सोहळा आटोपल्यावर सातही नंदीध्वज पुढे रवाना झाले.लहानपणापासून यात्रेत येण्याची माझी परंपरा आहे. मी कुठेही असलो तरी यात्रा चुकवत नसतो. श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेने मी राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवली. सोलापूरकरांना सुख, शांती आणि आनंद दे, एवढंच मागणं मी सिद्धरामांपुढे मागतो. - सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री.हिरेहब्बूंनी स्वीकारला शासकीय अहेरविसावा घेतल्यावर नंदीध्वज मिरवणूक सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी श्री सिद्धेश्वर प्रशालेसमोरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. तेथे सागर हिरेहब्बू आणि अन्य हिरेहब्बू यांचा मानकरी देशमुख मंडळींनी आहेर करून सन्मान केला. ब्रिटिश काळापासून मिळणारा शासकीय आहेरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुपूर्द करण्यात आला.