गतवर्षी कोरोना संसर्गामुळे तब्बल नऊ महिने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांचे बाजारपेठेतील व्यवहार बंद असल्याने आर्थिक संकटाशी सामना करावा लागला. आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कडक निर्बंध लादले गेल्याने गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेतील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे कष्टकरी मजुरांचा रोजगार बुडाला. अशात चिंचा फोडण्याचा नवाच रोजगार मिळाला आहे.
करमाळा शहरासह केम, जेऊर, कोर्टी, सालसे, साडे, जातेगाव, वीट, पांडे, देवळाली, हिवरवाडी या भागातील तब्बल दहा हजार कुटुंबांना कोरोनामध्ये घरबसल्या सुरक्षित रोजगार उपलब्ध झाला आहे.
----
परराज्यात होते निर्यात
ऐन उन्हाळ्यात चिंचा काढणीला येतात व त्या चिंचा फोडून चिंचा व चिंचोके वेगळे करून ते व्यापाऱ्यांमार्फत आंध्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यात पाठविले जातात. करमाळ्यात या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल असून, एक कुटुंब दिवसाला सातशे ते हजार रुपये कमाई करते. स्थानिक व्यापारी एका किलोला पंधरा रुपये मजुरी देऊन चिंचा फोडून घेतात. या नवीन रोजगारात प्रामुख्याने महिला मजुरांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
----
हातावरची कमाई
बागवान, दलाल व ठेकेदार ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतावरील बांधावर असलेल्या चिंचेची झाडे घेतात. त्या झाडावरील चिंचा पाडून व्यापाऱ्यांना विक्री करतात. एक कुटुंब दिवसाला किमान अर्धा ते पाऊण क्विंटल चिंचा फोडतात. लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या सुरक्षितपणे चिंचा फोडण्याचा रोजगार मिळाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांना हातावरच्या कमाईमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
---
कोरोनामुळे बाजारपेठेतील व्यवहार बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. चिंचा फोडण्याचा चांगला रोजगार घरबसल्या मिळाल्याने कुटुंबात राहून काम करण्याचा आनंद वेगळाच व चार पैसे मिळत असल्याने कोरोनाच्या काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.
-दत्ता कानपुडे, मजूर करमाळा
-----
कोरोनाकाळात घरबसल्या चिंचा फोडून रोजगार मिळवणारे पांडे गावातील कुटुंब.