वैराग : शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून कडब्याची गंजी पेटवून दिल्याची घटना बार्शी तालुक्यात तडवळे येथे घडली. यात ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी वैराग पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी प्रिया प्रशांत रायजादे (वय २५, रा. तडवळे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी मधुकर रायजादे यांची भावजय वैष्णवी हिच्याशी प्रियाचे घरगुती कारणावरून किरकोळ भांडण झाले होते. यावेळी रायजादे हा तेथे आला व भावजयी बरोबर का भांडतो, तुला बघून घेतो म्हणत निघून गेला. त्यानंतर रात्री ११.३० सुमारास आरोपी हा कडब्याच्या गंजीच्या जवळ उभा असलेला दिसला होता. त्याचवेळी कडब्यातून जाळ व धूर येत असल्याचेही दिसून आले. त्यानंतर मधुकर हा उसाच्या शेतात पळून गेला. पेटलेली कडब्याची गंज नागरिकांनी पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराचे वारे असल्यामुळे ती जास्तच पेटत गेली.