सोलापूर : जिल्ह्यातील ५० हून अधिक प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स अद्यापही परदेशात अडकून पडले आहेत. जवळचे पैसे संपले आहेत. विमान कंपन्यांनी परतीसाठी लाखो रुपयांचे तिकीट दर आकारल्यामुळे या विद्यार्थ्यांची, पालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांना परत सोलापुरात आणण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेते, सामाजिक संघटना यांनी पुढे यावे, असा टाहो त्यांनी फोडला आहे.
मूळचे सोलापूरकर आणि दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयातील कार्यरत असलेले डॉ.अशोक खटके यांनी या तरुण डॉक्टरांच्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे पोहोचविल्या आहेत. डॉ. खटके म्हणाले, सोलापूर शहर, सांगोला, करमाळा, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, कुर्डूवाडी या भागातील तरुण डॉक्टर्स राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात प्रशिक्षणासाठी हे विद्यार्थी चीन, जपान, अमेरिका, रशियासह विविध देशांमध्ये गेले आहेत. मार्च महिन्यात हे सर्व विद्यार्थी परतणार होते. या काळात लॉकडाऊन जाहीर केला.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याच देशात थांबावे लागले. काही जणांची विद्यापीठांनी सोय केली आहे; मात्र बºयाच जणांना स्वखर्चाने तिथे राहावे लागत आहे. हा खर्च परवडणारा नाही. काही विद्यापीठातून या विद्यार्थ्यांना होस्टेल रिकामे करायला सांगण्यात येत आहे. आता लॉकडाऊन शिथिल होत असताना विमानप्रवास सुरू होण्याचे संकेत आहेत; मात्र विमानाची तिकिटे चार ते पाच पटीने वाढवण्यात आली आहेत. हा खर्च कोणत्याही पालकांना परवडणारा नाही. ५० हून अधिक विद्यार्थ्यांची व्यक्तीगत, पासपोर्ट क्रमांक आमच्याकडे आहेत, असेही डॉ. खटके यांनी सांगितले.
गडकरींनी नागपुरात जे केले ते इथे अपेक्षित- डॉ. खटके म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील तरुण डॉक्टर्स परदेशात अडकून पडले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विद्यार्थ्यांना नागपुरात परत आणण्यासाठी मोठी मदत केली. आर्थिक खर्चाची तजवीज केली. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी याच पद्धतीने पुढे येणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुण डॉक्टरांना आपल्या मूळगावी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. परतल्यानंतर या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्याचीही सोय करणे गरजेचे आहे.