माजी आमदार गणपतराव देशमुख व माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी गेल्या ३० वर्षांपासून सांगोला तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात खांद्याला खांदा लावून एकत्रित काम केले. सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न असो किंवा इतर अन्य विकासाच्या प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांनी दीपक साळुंखे-पाटील यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेे आणि त्यांच्यासोबत विधानसभेपासून ते ग्रामपंचायती आणि सहकाराच्या सर्व निवडणुका एकत्रित लढवल्या. या दोन्ही नेत्यांच्या तब्बल एक ते दीड तास झालेल्या दीर्घ भेटीत कोरोनाच्या सद्यपरिस्थितीविषयी चर्चा झाली. यावेळी प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दीपक साळुंखे यांनी गणपतराव देशमुख यांना दिला. यावेळी गणपतराव देशमुख यांनी स्व. काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पत्नी शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या प्रकृतीचीही तितक्याच आपुलकीने चौकशी करत सध्या कोरोनाच्या काळात काळजी घेण्याचे दीपक साळुंखे-पाटील यांना सांगितले.