पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुजोरा दिला हाेता. मुख्यमंत्र्यांनी उजनीतून पाणी नेण्याला परवानगी दिली. तसेच त्यासाठी सर्वेक्षण केले, ४०० कोटी रुपयांची तरतूद त्याकामासाठी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये खदखद होती. यामुळे जिल्ह्यातील आमदार, खासदार व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीजवळ उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उजनीचे पाणी पुणे जिल्ह्यात देण्याबाबतचा आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
असे असले तरी, उजनीचे पाणी इंदापूर व पुण्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंजुरी जलसंपदा मंत्री रद्द करु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत आदेश रद्द केला सांगण्यात येते, त्यात काही तरी लबाडी वाटत असल्याचे आ. परिचारक यांनी सांगितले.
कारण आदेशामध्ये पुण्यातून येणारे सांडपाणी उजनी धरणात मिसळते. ते पाणी उचलून आम्ही इंदापूर तालुक्यतील २२ गावांना देणार आहोत. उजनी धरणामधून पाणी देणार, या शब्दप्रयोगाला आमचा विरोध आहे. पुण्यातून येणारे पाणी उरळी कांचन जवळ पूल बांधून अडवून तेथून पाणी इंदापूरला द्यावे. परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना तुमच्या जिल्ह्याचे पाणी आम्ही घेऊन जाणार नाही, असे लेखी देऊन समजावून सांगणे गरजेचे होते. मात्र, योजना रद्द केली म्हणजे याच्यामागे त्यांच्या मनात काहीतरी पाप आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे मत आ. परिचारक यांनी व्यक्त केले आहे.
८ आमदार, २ खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला नाही वेळ
उजनीच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय झाला. त्यासाठी काय रुपरेषा करायची, असे धोरण ठरले. खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली. त्यांना आठ आमदार व २ खासदार भेटायला येणार आहेत. वेळ देण्यात यावी, असा मेसेज पाठवण्यात आला होता. परंतु आठ दिवस झाले तरी वेळ देण्यात आला नाही. भेटी संदर्भात कसलाच निरोप मिळाला नाही. यामुळे संघर्ष करण्यासाठी निर्णय घेतला होता.
...म्हणून बदलला निर्णय
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी पुणे जिल्ह्याला चाललं आहे, ते पाणी आम्ही वाचवू शकणार नाही. यासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर आम्ही आमदार पांडुरंगाची क्षमा मागणार होतो. उजनीचे पाणी पुणे जिल्ह्याला नेण्याच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील उरलेली सत्ता केंद्रे उद्ध्वस्त होतील, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.