सोलापूर : अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांची आम्ही काळजी घेतो. त्यांना पोषण आहार देतो. पण, आमच्या मुलांच्या भवितव्याच काय ? असा सवाल उपस्थित करत अंगणवाडीताईंनी शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.
राज्य शासनाने राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रास्त भाव धान्य दुकानातून देण्यात येणारे गहू तांदूळ उत्पन्न मर्यादा अधिक दाखवून देणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करण्यात येण्याची मागणी करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्यात यावे, पेन्शन मिळावी, ग्रॅज्युइटी मिळावी यासह प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवेढा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मुलांसह धरणे आंदोलन केले. याप्रसंगी संतप्त आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात आक्रोशी व्यक्त करत घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दररोज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहेत. शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मुलांसह धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.