सांगोला : एसएमएस करुन ३ लाखाचा बनावट धनादेश देऊन एका ठगसेनाने १ लाख ७० हजारांचे दागिने घेऊन सांगोल्यात एका सराफला गंडविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
२० डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२ : १५ च्या सुमारास सांगोला बस स्थानकासमोर खंडोबा ज्वेलर्स या दुकानात हा प्रकार घडला. याप्रकरणी दुकान मालक बापूसाहेब महादेव निंबाळकर (रा. वासूद रोड, सांगोला) यांनी चार महिन्यानंतर १८ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी रणधीर राजेंद्र भोसले (रा. खानविलकरवाडा, जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार बापूसाहेब महादेव निंबाळकर यांचे सांगोला बसस्थानकासमोर महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये खंडोबा ज्वेलर्स या नावे दुकान आहे. २० डिसेंबर रोजी दु.१२:१५ च्या सुमारास एक ग्राहक आला. माझ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केले आहे. ते आम्हाला मान्य नाही, परंतु शेवटी बहीण आहे. वडिलांच्या संपत्तीत तिचाही हक्क असल्याचे सांगत भावनिक केले. यावेळी दागिने दाखवा म्हणाला. नेकलेस , चैन ,टाॅप्स असे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने काढून घेतले. १ लाख ७० हजार ६६४ रुपयांचे ३२.८२ ग्राम दागिने खरेदी केले. यावेळी त्याने रणधीर भोसले याने दागिन्यांचे पैसे एनईएफटीद्वारे पाठवतो, १० ते १५ मिनिटात खात्यावर पैसे जमा होतील म्हणाला. दरम्यान ३ लाख रुपयाचा धनादेश देतो असे सांगत विश्वास संपादन केला. व्यवहार झाल्याचा मेसेज येताच दुकान मालकाचा त्याच्यावर विश्वास वाढला. त्याने आणखी दागिने मागितले. दागिने घेऊन गेल्यानंतर बापूसाहेब निंबाळकर यांनी २० मिनिटांनी त्याला फोन केला असता थोड्यावेळाने पैसे जमा होतील असे सांगितले. काही वेळाने त्यांनी त्याला पुन्हा एकदा संपर्क केला असता तो बंद लागला.
---
अन फसवणुकीचा प्रकार मुलाच्या लक्षात आला
दरम्यानच्या महादेव नारायण निंबाळकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्या दागिने पोटी पाठपुरावा झाला नाही. दरम्यान १८ मार्च रोजी बापूसाहेब निंबाळकर यांनी मोबाईल व्हाॅट्सअपवर लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक करण्यात आल्याची बातमी वाचली आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.