मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मोठ्या व प्रमुख असणाऱ्या खंडाळी, अंकोली, टाकळी सिकंदर व आष्टी या चार ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीप्रणित आघाडींनी झेंडा फडकवला आहे. ढोक बाभळगाव ग्रामपंचायतीवर मात्र शिवसेनाप्रणित आघाडीला पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. टाकळी सिकंदरमधे जरी राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या असल्या तरी तेथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. हा तिढा सरपंचपदाच्या आरक्षणा नंतरच सुटणार आहे.
टाकळी सिकंदर येथे १५ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमा परिवाराच्या पॅनलला धक्का दिला. राष्ट्रवादीप्रणित टाकळी सिकंदर ग्राम विकास पॅनलचे प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. सिकंदर परिवर्तन पॅनलला सहा जागा मिळाल्या. येथे भीमा परिवाराची सत्ता गेली तरी टाकळी ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीच्या १५ जागेसाठी दोन पॅनल उभे होते. यामधे राष्ट्रवादीचे राजाभाऊ गुंड-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रणित ग्राम विकास महाआघाडीला ८ जागा मिळाल्या. विजयराज डोंगरे प्रणित ग्रामविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. आष्टी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात राजाभाऊ गुंड पाटील, मदन पाटील यांना यश आले आहे.
बिनविरोध होणार म्हणून गेली चार महिने गाजलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीसाठी अखेर निवडणूक लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित स्वर्गीय प्रभाकर मुळे, ग्राम विकास पॅनलचे प्रमुख सचिन बाबर, व श्यामराव शिरसाट यांच्या गटाला १२ जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधात माऊली ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
अंकोली ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित भैरवनाथ ग्राम विकास आघाडीचे पॅनल प्रमुख अशोक क्षीरसागर यांच्या गटाला ८ जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित लोकनेते साहेबराव पवार पॅनलला तीन जागा मिळाल्या. अंकोली ग्रामपंचायतीमधे पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात अशोक क्षीरसागर यांना यश आले आहे. ढोकबाभळगाव येथे पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले. येथे एकूण ११ जागेसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये दादाराव पवार यांच्या रेणुका देवी परिवर्तन विकास आघाडीला चार जागा मिळाल्या तर यल्लमा देवी विकास आघाडीचे प्रमुख भीमराव मुळे , बंडू मुळे यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या.