साेलापूर : लातूरमध्ये दारू पिऊन पडलेल्या दारूड्यांच्या मोटारसायकली पळवून सोलापुरात विकल्या होत्या. सोलापुरात चोरलेल्या मोटारसायकली लातूरमध्ये विकणाऱ्या अंतर जिल्ह्यातील चार चोरट्यांना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डी.पी. पथकाने अटक केली आहे. चौघांकडून तीन लाख रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अमित मधुकर थोरात (वय २५ रा.साईनगर, औसा जि.लातूर), पांडुरंग हणुमंत पांचाळ (वय २३ रा.उट्टी (ब्रु) ता.औसा जि.लातूर), मनोज विजयकुमार राठोड (वय २३ रा.अरिहंतनगर, याकतपूर औसा जि.लातूर), बालाजी श्रीमंत लोंढे (वय २१ रा. याकतपूर रोड बालाजी मंदिर औसा जि.लातूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि.३ ऑगस्ट रोजी मोहन संभाजी जाधव (वय ३० रा.कासेगांव ता.दक्षिण सोलापूर) यांनी रूपाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोटारसायकल लावली होती. रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून मोटारसायकल चोरून नेली होती.
या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीची दखल घेऊन डी.बी. पथकाने शोध मोहीम सुरू केले, तेव्हा दि.४ ऑगस्ट रोजी अमित थोरात व पांडुरंग पांचाळ हे दोघे नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून तुळजापूरच्या दिशेने जाताना आढळून आले. पथकाने दोघांना आडवून गाडीच्या कागदपत्राची विचारणा केली. तेव्हा दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांचा संशय आल्याने त्यांना जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आणले. कसून चौकशी केली असता, त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता, अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पाेलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडुकर, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, हवलदार आर.एन. थोरात, नंदकुमार गायकवाड, सुरेश जमादार, योगेश बर्डे, बापू साठे, अय्याज बागलकोटे, प्रकाश गायकवाड, अतुल गवळी, सैपन सय्यद, अविनाश राठोड, अभिजीत पवार, गोपाळ शेळके, नीलेश घोगरे, सुहास गायकवाड, यशसिंह नागटिळक यांनी पार पाडली.
मौजमजा करण्यासाठी करायचे चोऱ्या
- चौघांचे शिक्षण १० पर्यंत झाले असून, कामधंदा न करता, केवळ मौज मजा करण्यासाठी मोटारसायकली चोरत होते. लातूर, औसा, उदगीर परिसरात दारू पिऊन पडलेल्या दारूड्यांच्या मोटारसायकली पळवून सोलापुरात आणल्या. अवघ्या १० ते १५ हजार रुपयाला विकल्या होत्या. जाताना सोलापुरातून मोटारसायकली चोरून त्या लातूरमध्ये ग्रामीण भागात १० ते १५ हजार रुपयाला विकल्या होत्या. मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करणे, दारू पिणे हा त्यांचा नित्यक्रम होता.