करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखाना कोण चालवायला घेईल याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. जो कोणी कारखाना चालवायला घेईल त्याने सर्वप्रथम कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मिटवावा, अन्यथा कारखान्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा शेतकरी, कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अवारात कामगारांच्या उपस्थित बोलावलेल्या बैठकीत बोलताना दिला.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू होण्याच्या मार्गावर आहे. हा कारखाना कोण चालवायला घेणार आणि जो कोणी घेईल तो कामगारांच्या थकीत पगारी देईल का की फक्त आश्वासन देणार? किती कामगारांना कामावर ठेवणार किंवा कामगारांची कपात करणार? या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी सर्व कामगारांची आदिनाथ सहकारी कारखान्याच्या आवारात बैठक बोलावली होती. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, दशरथ कांबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सर्व कामगार आदिनाथचा यापुढील लढा दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे एकमुखी निर्णय घेण्यात आला.
दशरथ कांबळे म्हणाले, कारखान्यामध्ये करोडो रुपयांची साखर पडून असताना, फक्त राजकारण आणि स्वार्थापोटी साखरेची विक्री केली जात नाही. कारखाना प्रत्येक कामगाराचे प्रत्येकी १५ लाख रुपये देणे आहे. हे सर्व देणे व कारखान्यावरील कर्ज कारखान्यातील सर्व साखरेची विक्री करून देता येईल. परंतु संचालकांना तसे करायचे नाही, असे म्हणत विविध मागण्यांसाठी व थकीत सर्व पगार लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी २० जानेवारी रोजी भाळवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
----
फोटो : ०९ करमाळा
आदिनाथ कारखान्यात कामगारांच्या उपस्थित बैठकीत बोलताना दशरथ कांबळे.