चपळगाव : कोणत्याही क्षेत्रातील जनतेला समाधानकारक कामगिरी करून न दाखविल्यामुळे भाजपला सगळेच कंटाळले आहेत. लोकहितासाठी जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला एकहाती सत्ता दिली. याचा गैरफायदा घेत भाजपने सुमार कामगिरी केली. मोदींनी वचनांची पूर्तता करण्याऐवजी नोटाबंदी केली. यामुळे सर्वसामान्य जनतेचे संसार उद्ध्वस्त झाले. ही बाब भविष्यासाठी घातक असून, ज्यांनी नोटाबंदी केली त्यांची व्होटबंदी करा व देश वाचवा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ हन्नूर येथे प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सिध्दाराम म्हेत्रे होते. अर्जुनराव पाटील, भगवान शिंदे, सिध्दार्थ गायकवाड, विश्वनाथ भरमशेट्टी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे उमेदवार डॉ़ जयसिध्देश्वरांवर टीका केली. पाटील म्हणाले, डॉ. जयसिध्देश्वरांनी कुण्या ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली नसताना थेट खासदारकीसाठी उभे आहेत, ही विसंगत बाब आहे. डॉ. जयसिध्देश्वरांनी काही केलेले चालतंय तर आम्हीपण उद्या महाराज झालेले तुम्हाला पटेल का? तुुम्ही जर देव असाल तर आताच सांगून टाका की मी निवडून आलोय.