सोलापूर - सैराट चित्रपटातील आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला चित्रपटातील कलाकार लंगड्या म्हणजेच तानाजी गळगुंडे याला मतदानाला मुकावे लागले आहे. मतदान हे कर्तव्य समजून तानाजीने आपल्या व्यस्त शेड्युलमधून बेंबळे हे गाव गाठले. मात्र, मतदार यादीत नाव नसल्याने तानाजीला मतदान न करताच, परत फिरावे लागले. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका तानाजीला बसला आहे.
माढा तालुक्यातील बेंबळे हे तानाजीचे मूळ गाव आहे. नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटानंतर गावकडंचं हे पोरगं महाराष्ट्रात स्टार झालं. आपल्या सकस अभिनयाने रसिकांना वेड लावलेल्या लावणारा तानाजी केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहिला. माढा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले. या मतदानासाठी शुटींगच्या व्यस्त कामातून तानाजी गावाकडं आला होता. पण, मतदान न करताच वापस गेला. मतदार यादीत नाव असल्याचा पाठपुरावा करूनही त्याचे नाव मतदार यादीत नसल्याने त्याला मतदान न करताच परतावे लागले.
तानाजीने मतदान यादीत नाव येण्यासाठी प्रशासनातील संबंधित कर्मचार्यांकडे अनेक महिन्यांपूर्वीच कागदपत्रे पोहच केली होती. तहसील कार्यालयातून खातरजमा करण्यासाठी तानाजीला दोनवेळा फोनही आला होता. त्यामुळे आपले मतदार यादीत नाव नक्की आले असेल, अशी खात्री तानाजीला होता. मात्र, मतदान केंद्रावर पोहोचताच, तानाजीची घोर निराशा झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान पार पडले. त्यासाठी, सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही माढा मतदारसंघातील आपल्या मूळगावी जेऊर येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला.