या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील उपरी येथील राहुल दत्तात्रय नागणे यांच्या बोलेरो जीपमधून ८ फेब्रुवारी २०१६ रोजी अंगणवाडी सेविका सोलापूर येथे आंदोलनास गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परत येत असताना पंढरपूर - मोहोळ रस्त्यावरील नारायणचिंचोली जवळ भरधाव वेगाने आलेल्या टँकरने बोलेरो जीपला जोराची धडक दिली. यामध्ये जीपचालक राहुल नागणे (२५), समर्थ शिवाजी जगदाळे (५ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीमधील दहा अंगणवाडी सेविका जखमी झाल्या होत्या.
याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदला होता. तत्कालीन फौजदार गौरीशंकर शिंदे यांनी सखोल तपास करीत पंढरपूर न्यायालयात संशयितांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. दरम्यान, या खटल्याचा निकाल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुंभार यांनी गुरुवारी दिला. यामध्ये आरोपी चालक चंद्रकांत सुदाम इंगळे (रा. वेणी, ता. फलटण, जि.सातारा ) यास दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा सुनावली.
या सुनावणी दरम्यान सरकारतर्फे ॲड. एम. एम. पठाण यांनी भक्कमपणे युक्तिवाद करीत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी टँकरचालकास शिक्षा सुनावली. यात कोर्ट पैरवी म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या एस. एच. थोरात यांनी काम पाहिले.
----
विविध कलमांव्दारे सुनावली शिक्षा
या खटल्याअन्वये कलम २७९ मध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार दंड, कलम ३०४ अन्वये एक वर्ष शिक्षा व शंभर रुपये दंड व दंड न भरल्यास दोन्ही कलमांमध्ये पंधरा पंधरा दिवस साधी कैद. कलम ३३७ अन्वये दोन हजार दंड, कलम ३३८ मध्ये एक महिना शिक्षा व तीनशे रुपये दंड, कलम ४२७ अन्वये एक महिना शिक्षा व पाचशे रुपये दंड, कलम १८४ अन्वये, दोन महिने शिक्षा व एक हजार दंड आणि कलम ३५७ अन्वये सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.