शहाजी फुरडे-पाटील
सोलापूर - जिल्ह्यातील शाळू ज्वारीची चर्चा दुबईत होत असून बार्शीतील या ज्वारीच्या भाकरी थेट दुबईतही चवीन चाखल्या जात आहेत. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या बार्शीची अनेक क्षेत्रात सरशी पाहायला मिळते. सिताफळ उत्पादनातून कृषी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या बार्शीची ज्वारी आता दुबईत आवडीने खाल्ली जात आहेत. बार्शीच्या बाजारपेठेतून दररोज जवळपास 30 ते 40 ट्रक ज्वारी परराज्यात विक्रीसाठी पाठवली जाते. बार्शीची ही ज्वारी दुबईच्या मॉलमध्येही विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. बार्शीची मालदांडी व ज्यूट ज्वारीही राज्यासह परराज्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले जात असले तरी ग्राहक खास बार्शीच्या ज्वारीची मागणी करतात. येथील मालदांडी ज्वारी शाळू या नावाने तर ज्यूट ज्वारी दूधमोगरा या नावाने बाहेरील बाजारपेठेत प्रचलित आहे. बार्शीतील या ज्वारीच्या ब्रॅण्डला कधी मागणी नाही असेही झाले नाही अन् कधी मालाचा तुटवडाही जाणवला नाही.
बार्शी तालुक्यात उत्पादित झालेली सर्व ज्वारी येथील बाजारपेठेतच विक्रीसाठी येते. येथील व्यापारी बांधवांकडून या मालाचे मशीन क्लिनिंग व प्रतवारी करून तो राज्यातील मुंबई, पुणे, नांदेड, सांगली, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, यासह हुबळी, धारवाड, गदग, बेंगलोर, दावणगिरी, हैदराबाद आदी विविध शहरांतील बाजारपेठेत पाठविला जातो. बार्शीची ज्वारी उच्च प्रतीची असल्याने बाजारपेठेत खास बार्शीच्या ज्वारीलाच मागणी असते. शिवाय व्यापारी बांधवांनीही ग्राहकांना ३० व ५० किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये बार्शीची शाळू, दूधमोगरा आदी नावाने आपापल्या ब्रॅण्डसह ती उपलब्ध करून दिली आहे.
दररोज एक कोटीच्या मालाची विक्री
सिझनमध्ये हाच आकडा साठ ते सत्तर ट्रक एवढा असतो. एका युनिटमध्ये तीस कामगार आहेत. म्हणजे या व्यवसायातून एक हजार कामगारांना बारा महिने रोजगार उपलब्ध झाला आहे. एका गाडीची किंमत ही तीन ते चार लाख होेते. म्हणजे या व्यवसायातून दररोज सुमारे एक कोटी रुपयांच्या मालाची विक्री होते.
ज्वारीची क्लिनिंग करून आपापल्या ब्रॅण्डच्या नावाने तीस किलो पॅकिंगमध्ये त्या ज्वारीची विक्री करतात. या ज्वारीला कोल्हापूर, कोकण, बंगळुरू, हैदराबाद, नांदेड, लातूर, हुबळी, धारवाड, गदग, सांगली, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, मुंंबई, दुबईसह देशातील विविध मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या ठिकाणी बार्शीची ज्वारी म्हणून या ज्वारीची विक्री होते.
- तुकाराम माने, माजी अध्यक्ष बार्शी मर्चंट असोसिशएन