शीतलकुमार कांबळे
सोलापूर : गोंदण्यानं हल्ली टॅटू असं आधुनिक नाव घेतलं असली तरी सोलापूरच्या तरूणाईला महापुरूषांच्या छायाचित्रांचंच आकर्षक असल्याचं सिद्धेश्वर यात्रेमध्ये दिसून आले. सोलापूरकरांच्या प्रतिसादामुळे राजस्थान, बिहारमधून आलेले साठ टॅटू कलावंतांच्या हाताला दिवसभर काम मिळत आहे. काही युवक - युवती फॅशनेबल टॅटू काढून घेत आहेत; तर प्रौढ वयातील यात्रेकरू आपल्या पती - पत्नीचं नावंही गोंदवून घेत असल्याचे निदर्शनास आले.
मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील मजकूर ते हातावर काढून देतात. मराठी किंवा इंग्रजी भाषा समजत नसली तरी शब्दांच्या वळणावरून ते सहजपणे काढू शकतात. एखादी डिझाईन काढायची असेल तर तीही पाहून ते काढू शकतात. या कलाकारांकडे एक अल्बम असून, यामध्ये अनेक प्रकारची अक्षरे काढण्यात आली आहेत. या अक्षरांच्या फॉँटची निवड केल्यानंतर त्याप्रमाणे नावे कोरली जातात. टॅटू काढताना अक्षरांऐवजी चित्र असेल तर त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. डिझाईनला सहाशे ते एक हजार रुपयांपर्यंतचे दर आकारले जातात. अशा डिझाईनला एक ते दीड तासांचा वेळ लागतो. सोलापुरातील लोक डिझाईन काढण्यापेक्षा नाव कोरण्याला जास्त पसंती देत आहेत.
टॅटू काढताना चुका होऊ शकतात, यामुळे आधी पेनने अक्षरे किंवा डिझाईन काढली जाते. त्यात काही चुका असल्यास दुरुस्त करण्यात येतात. त्यानंतरच टॅटू काढण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाते. टॅटू कलर, टॅटू मशीन यांच्या वापराने रेखाटले जाते. जितकी जास्त अक्षरे किंवा मोठी डिझाईन तितका जास्त वेळ लागतो. पूर्वी गोंदण हा एक धार्मिक भाग समजला जात असे. शिवाय फक्त हिरव्या रंगाचे दिसणारे गोंदण कपाळ, हनुवटी, हात अशा ठिकाणी काढले जात होते. साधारणपणे ग्रामीण भागातील लोक हे गोंदण काढत होते. आता शहरात टॅटू एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. त्यामध्ये खूप सारे रंग आणि डिझाईन्स पाहायला मिळतात. शरीराच्या मान, मनगट, खांदा येथे टॅटू काढण्याला तरुण पसंती देत आहेत.
५० रुपयात टॅटू- शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी आमच्याकडे टॅटू काढण्यासाठी येतात. त्यांना आम्ही टॅटू न काढण्याचा सल्ला देतो. ते शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी त्यांना अडचणी निर्माण होऊ नये. काही शासकीय ठिकाणी टॅटू असलेल्यांना कामावर घेतले जात नाही. यासाठी आम्ही त्यांना सांगतो. याला एक पर्याय म्हणून टेम्पररी टॅटू आहे. अवघ्या ५० रुपयांत आम्ही टेम्पररी टॅटू काढून देतो. यासाठी काळा व लाल असे दोन रंग आहेत. १० ते १२ दिवसांनंतर टॅटू निघून जातो, असे एका कलाकाराने सांगितले.
आमच्याकडे असणाºया अल्बममध्ये शेकडो डिझाईन्स आहेत, त्यातून टॅटूची निवड क रता येते. सोलापुरातील युवक छत्रपती शिवाजी महाराज, देवतांची नावे काढण्याला पसंती देतात. तर काही जण मित्र, मैत्रीण, पती, पत्नी यांचे नाव काढत आहेत. सध्या आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून, २६ जानेवारी रोजी जास्तीत जास्त सोलापूरकर यात्रेला येतील.- गिरीजेश कुमार, कलाकार.