करमाळा : करमाळ्यातील व्यापार पेठेत चलनात नव्याने आलेल्या दहा रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झालेला असून, अनेकांची या बनावट नोटांमुळे फसगत झाली आहे. दहा रुपयांची नोट किरकोळ रक्कम असल्याने कोणी बारकाईने तपासून घेत नसल्याचा फायदा घेतला जात आहे.
रिझर्व्ह बँकेने भारतीय चलनात नुकत्याच दहा रुपयांच्या नव्या नोटा आणल्या आहेत. नवीन आलेल्या दहा रुपयांच्या नोटांप्रमाणेच हुबेहूब त्याच आकारात, त्याच रंगात दहा रुपयांच्या बनावट नोटा गेल्या दोन सप्ताहापासून व्यवहारात फिरू लागल्या आहेत. बनावट असलेल्या दहा रुपयांच्या नोटा आठवडी बाजार, व्यापार पेठेत चलनात आढळून येऊ लागल्या आहेत.
करमाळा शहरात कित्येक व्यापारी, दुकानदार व ग्राहक यांच्याकडे या दहा रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी बनावट नोटा कु ठून बाजारात येतात, याकडे लक्ष देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे जगदीश अगरवाल यांनी केली आहे.
बनावट नोटही अस्सलया बनावट नोटांवर कोणत्याही प्रकारचा नंबर नसून नव्याने चलनात आलेल्या अस्सल नोटेप्रमाणे दिसणारी ही बनावट दहा रुपयांची नोट घेताना सहजासहजी व्यापारी, ग्राहक फसतो. दहा रुपये ही किरकोळ रक्कम असल्याने कोणी या नोटेकडे बारकाईने पाहत नाही. पण, एखादा चिकित्सक व्यापारी बारकाईने पाहिल्यानंतर ही बनावट नोट असल्याचे लक्षात येते.