सोलापूर : रेल्वेस्थानकावर चहा कुल्हडमधून देण्याचा रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांनी निर्णय घेतला आहे. या कुल्हडमुळे सोलापूर रेल्वेस्थानकावर पाच रुपयाला मिळणाऱ्या चहाची किंमत पंधरा रुपये होणार आहे. याशिवाय सद्यस्थितीला एक्सप्रेस व पॅसेजर गाड्या या कमी प्रमाणात असल्याने सोलापूर रेल्वेस्थानकावर दररोज फक्त ३०० ते ४०० कुल्हड लागतील, असा अंदाज चहा विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वेचे सोलापूर येेथे विभागीय कार्यालय आहे. या विभागात एकूण ७५ लहान व मोठे स्थानके आहेत. प्रत्येक मोठ्या स्थानकावर चार ते पाच अधिकृत चहा विक्रेते आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे पॅसेजर व नियमित धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या कमी प्रमाणात असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे चहाची विक्रीही कमी प्रमाणात होत असल्याचे चहा विक्रेत्यांनी सांगितले.
रेल्वेच्या या धोरणामुळे प्लॅस्टिकमुक्त भारताकडे एक पाऊल पडत आहे. शिवाय रेल्वेच्या या धोरणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
सोलापुरातच बनतात कुल्हड...
सोलापूर शहरातील कुंभार गल्ली व आकाशवाणी परिसरातील दोन ते चार कुंभार कुटुंबीय कुल्हड बनवितात. मातीपासून बनविलेले एक कुल्हड कमीत कमी पाच ते सात रुपयांना मिळते. जास्त नग घेतल्यास किमतीत थोड्याफार प्रमाणात कपात होते. यासाठी बाहेरील राज्यातून माती आणावी लागते. एक दिवसात कमीत कमी सोलापुरात ५० हजार कुल्हड बनविले जातात.
चहाच्या किमती वाढल्या
कुल्हडमधून चहा विक्री केल्यास चहाची किंमत नक्कीच वाढेल. अगोदरच चहापत्ती, दूध व साखरेचे दर वाढल्याने चहाच्या किमती वाढली त्यामुळे प्रवासी चहा पिण्याच्या मानसिकतेत नाहीत.
- रितेश अग्रवाल, चहाविक्रेते, सोलापूर
पर्यावरणपूरक निर्णय
कुल्हडच्या किमती जर सवलतीच्या दरात मिळाल्या तर चहाची किंमतही आपोआप कमी होईल, याचा नक्कीच प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबत विचार व्हावा.
- आबा चव्हाण, चहाविक्रेते, सोलापूर
- चहाविक्रेते, सोलापूर