सोलापूर : राज्यातील शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यात येते. शाळांना व्यावसायिक मीटर बसवणे व व्यावसायिक दराने वीज बिल वसूल करणे यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आर्थिक तरतूद करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांना मोफत वीजपुरवठा करावा अशी मागणी शिक्षक भारती संघटना, सोलापूरने राज्यस्तरीय बैठकीत केली. यासाठी संघटना आता आक्रमकपणे भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य शासनमान्य शिक्षक भारती संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक नाशिक येथे नुकतीच पार पडली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, महासचिव व मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुभाष मोरे, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्रमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी, संघटनेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर चर्चा करण्यात आली.
राज्यातील शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यात येते. शाळांना व्यावसायिक मीटर बसवणे व व्यावसायिक दराने वीज बिल वसूल करणे यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आर्थिक तरतूद करणे अडचणीचे ठरत आहे. विद्या मंदिरांना व्यावसायिक वीज मीटर जोडणे हे शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे त्यामुळे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी राज्यातील शाळांना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली. यानंतर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. याचवेळी करमाळा तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ता विजयकुमार गुंड यांनी सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचा प्रचार व प्रसार याविषयी राज्य कार्यकारणीस माहिती दिली. या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार, जिल्हा संघटक शरद पवार, जिल्हा संपर्कप्रमुख रणजित दडस,सोलापूर शहराध्यक्ष देवदत्त मेटकरी, शहर सचिव नितीन रुपनर, उपस्थित होते.