अक्कलकोट : ऑक्सिजन बेड मिळू शकल्याने अक्कलकोटच्या शहाजी हायस्कूलच्या एका सहशिक्षिकेला जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली.
वैशाली साळुंखे-बिराजदार असे त्या सहशिक्षिकेचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मागील पाच दिवसांपासून त्रास होत होता. त्यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत गेली. मंगळवारी अक्कलकोट येथील एका स्थानिक खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता ऑक्सिजन केवळ ४७ लेव्हलवर आले होते. त्या अक्कलकोट येथील डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. मात्र, बेड उपलब्ध झाले नाही. सोलापूर येथे जाऊन बेडसाठी धावपळ केली. एके ठिकाणी रात्री उशिरा बेड उपलब्ध झाला. मात्र, आजार बळावला होता. त्यामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर बुधवारी पहाटे त्या शिक्षिकेचा मृत्यू झाला.
--
शिक्षणसेवेला वाहून घेतलेले दाम्पत्य
दाम्पत्य शिक्षक असून पती मैंदर्गी येथील हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. शांत व संयमी स्वभावाच्या वैशाली यांनी अनेक विद्यार्थी घडविले. या दोघांनीही शिक्षण सेवेला वाहून घेतले आहे. दहा वर्षांपासून शिक्षण सेवेत होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू ,सासरे, आई, वडील, दोन जुळी मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
--
०५ वैशाली साळुंखे