सोलापूर : पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्दी-ताप असलेल्या मतदारांना शेवटच्या तासाभरात मतदान करता येणार आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची थर्मल स्क्रीनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे मास्क नसेल तर त्यांना मास्क वाटपही करण्यात येत आहे.
मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान टेंपरेचरमध्ये वाढ दिसल्यास मतदारांना काही काळ मतदान केंद्रावरील वेटिंग रुममध्ये बसवण्यात येत आहे. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १९७ मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांवर जवळपास ४ हजार १९४ कर्मचारी कार्यरत आहेत. १९७ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. तसेच स्वतंत्र व्हिडिओ ग्राफरद्वारे मतदान केंद्रातील प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तसेच पुणे विभागातील अधिकारी लाईव्ह बघत आहेत.
तीन रांगा असतील
प्रत्येक मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा करण्यात आले आहे. पहिली रांग अपंग मतदाराकरिता असेल दुसरी महिला मतदारांकरिता तसेच तिसरी रांग पुरुष मतदारांकरिता करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या व तोतयागिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होईल.