अकलूज : मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून टाइमपास करण्यासाठी एक शिक्षक अकलूज येथील बंद स्थितीतील अर्धवट बांधकाम असलेल्या मंगल कार्यालयाच्या इमारतीवर गेला. तोल जाऊन खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. नितीनकुमार अशोक थोरात (वय ४६, रा. शिराळ, ता. माढा) असे मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव असून शनिवारी सायंकाळी ४:२१ च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माळीनगर येथील माॅडेल विविधांगी प्रशालेतील नितीनकुमार थोरात हे शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात घेऊन आले होते.
मुलांना परीक्षा वर्गात बसवून टाइमपास करण्यासाठी ते महावीर पथाच्या पाठीमागे लीलावती मंगल कार्यालयाच्या अर्धवट बांधकाम स्थितीतील इमारतीवर गेले. सायंकाळी इमारतीवरून त्यांचा तोल गेला आणि खाली पडून डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन थोरात यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. अधिक तपास हवालदार भातुंगडे करीत आहेत.