सोलापूर: शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याला आता काही तास उरले असताना जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल रखडला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 8 हजार 632 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 1हजार 910 रॅपिड कीटद्वारे तपासण्या करण्यात आल्या, यात पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. 6 हजार 722 प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेचे अनेक अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
तालुकानिहाय झालेल्या चाचण्या व पॉझिटिव्ह अहवाल पुढील प्रमाणे आहेत. अक्कलकोट: 759 ( पॉझिटिव्ह:0), बार्शी:1182 (1), करमाळा: 291 (0), माढा: 637 (0), मोहोळ: 864 (1), माळशिरस: 819 (0), मंगळवेढा: 521 (1), उत्तर सोलापूर: 329 (0), पंढरपूर: 1032 (३), सांगोला: 1415 (1), दक्षिण सोलापूर: 783 (0). शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या चाचण्या वाढल्यामुळे प्रयोगशाळेत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्यांचे अहवाल येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ज्या शिक्षकांचा अहवाल आला त्याच शिक्षकांना बुधवारी शाळेवर हजर राहता येणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी 50% शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याने बऱ्याच शिक्षकांच्या एंटीजन चाचण्याही करण्यात येत आहेत. माध्यमिक शाळा प्रमाणे प्राथमिक शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे बुधवारी दहा महिन्यानंतर उघडण्यात येणार्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील तयारीचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडून आढावा घेतला आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्याचे वातावरण आहे.